नगर : छप्पन गुंठे जमिनीच्या वादातून दत्तात्रय सुखदेव ठुबे (५६ वर्षे) या शेतकऱ्याचा डोक्यात लोखंडी सळईने वार करून खून करण्यात आला.
ही घटना पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील शेतजमिनीत शनिवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दत्तात्रय सुखदेव ठुबे (नारायण गव्हाण, ता. पारनेर) हे राहत असलेल्या घरासमोरील विकलेल्या ५६ गुंठे जमिनीच्या वादातून दोघांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी सळईने मारहाण केली. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, तपासात ठुबे यांच्या डोक्यात व पाठीवर असलेल्या जखमांमुळे त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ४८ तासांत आरोपी राहुल बाळासाहेब दिवटे, तेजस बाळासाहेब दिवटे (दोघे बाबुर्डी, ता. पारनेर) या दोघा भावांना अटक केली.