सिडनी : एका समुद्री शिंपल्याच्या प्रजातीमध्ये आढळून येणारा एक घटक कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी असल्याचे एका ताज्या अध्ययनातून समोर आले आहे.
या शिंपल्याच्या मोलस्क गं्रथींमध्ये आढळून येणाऱ्या खास प्रकारच्या रसायनावर सुमारे दहा वर्षे सुरू असलेल्या संशोधनानंतर शास्त्रज्ञ या निष्कर्षावर पोहोचले आहेत. त्यांच्या माहितीनुसार, समुद्री शिंपल्यातील हा घटक आतड्याच्या कर्करोगापासून बचाव करण्यात प्रभावी आहे.
ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ कॅथरिन एबॉट यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने हे अध्ययन केले असून त्यांनी सांगितले की, हे निष्कर्ष उत्साह वाढविणारे आहेत. यामुळे आतड्यांच्या कर्करोगावर नवे औषध विकसित करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.
समुद्री शिंपल्यात मिळणारा हा खास घटक आतड्यांमध्ये कर्करोगाची गाठ तयार होण्यापासून रोखतो. हा कर्करोग जगभरात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, समुद्री जीव आणि रोपट्यांमध्ये आढळून येणारे अनेक घटक भविष्यात वैद्यकशास्त्रासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.