नवी दिल्ली : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजसच्या नौदलासाठीच्या आवृत्तीने अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणे, हे तेजसचे नौदलात सामील होण्याच्या दिशेने मोठे यश आहे.
जमिनीच्या तुलनेत विमानवाहू जहाजांवरील रनवे म्हणजेच धावपट्टी छोटी असते. या छोट्या धावपट्टीवर उतरल्यानंतर झटका टाळून विमानाचा वेग तत्काळ कमी करण्यासाठी विमानाच्या मागील बाजूला असलेले एक हूक धावपट्टीवरील तारेत अडकणे आवश्यक असते. हे हूक तारेत अडकल्यानंतर ही तार विमानाला अधिक पुढे जाऊ न देता थांबवते. या प्रक्रियेला अरेस्ट लँडिंग म्हणतात.
नौदलात विमानाचा समावेश करण्यापूर्वी जमिनीवरील तळांवर अरेस्ट लँडिंगची चाचणी घेतली जाते. गोव्यातील तळावर शुक्रवारी तेजस विमानाच्या नौदलासाठी तयार केलेल्या आवृत्तीची लँडिंग अरेस्टची चाचणी घेण्यात आली. विमानवाहू जहाजावर असणाऱ्या परिस्थितीमध्ये घेण्यात आलेली ही चाचणी तेजसने यशस्वीरीत्या पूर्ण केली. अरेस्ट लँडिंगची ही चाचणी वारंवार यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच तेजसचा नौदलात समावेशाचा मार्ग प्रशस्त होईल.
गोव्यातील तळावरील चाचणीच्या निकालांवर नौदलाचे वैमानिक तेजसला विमानवाहू युद्धनौकेवरील लँडिंग अरेस्टसाठी पुढे न्यायचे की नाही, यावर निर्णय घेतील. पुढील काही दिवसांत देशाची एकमेव विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर तेजसची चाचणी होईल.
आतापर्यंत काही मोजक्या देशांची लढाऊ विमानेच अरेस्ट लँडिंगची खडतर प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यांमध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स या देशांचा समावेश आहे. नुकतेच चीनने विकसित केलेले स्वदेशी लढाऊ विमानदेखील अरेस्ट लँडिंगच्या चाचणीत यशस्वी झाले आहे.