कोपरगाव :- तालुक्या-तील खोपडी येथील आरती शामहरी त्रिभूवन (वय 22) या बेपत्ता महिलेचा मृतदेह शेजारील विहिरीत आढळून आल्याने तिच्या माहेरच्या मंडळींनी आरतीचा घातपात झाला असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
याबाबतची गौतम पठारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती आनंदा पठारे हिचा विवाह गेल्या 30 एप्रिल 2018 रोजी खोपडी (कोपरगाव) येथे करण्यात आला होता. सासरी आरतीला माहेरुन पैसे आणण्यासाठी त्रास दिला गेला.
सुरुवातीस 50 हजार व नंतर 1 लाख रुपयांची मागणी सासरच्या मंडळींनी केली होती. विधवा असलेल्या आरतीच्या आईने मुलीचा संसार चांगला होईल, म्हणून 50 हजार कर्ज काढून दिले होते. गेल्या सात आठ दिवसांपासून सासरच्यांनी पुन्हा कुरबुर सुरु केली होती.
दोन दिवसांपूर्वी तुमची मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. संक्रांतीसाठी आरतीचा भाऊ गणेश तिला घेण्यासाठी गेला होता. त्याच्या समोर सासरच्या मंडळींनी आरतीला इकडे-तिकडे शोधण्याचे नाटक केले व जवळील विहिरीजवळ नेले असता मयत आरतीची चप्पल व मोबाईलचा लाईट लागलेला दिसून आला.
विहिरीमध्ये आरतीचा मृतदेह आढळून आला. मात्र तिच्या हाता-पायाला जखमा असून डोक्याला मार लागलेला आहे. तसेच तिचा एक कानही अर्धा तुटलेल्या अवस्थेत आहे. मयत आरती हिने आत्महत्या केली नाही, तर सासरच्या लोकांनी तिचा घातपात केला असल्याचा आरोप गौतम पठारे यांच्यासह माहेरच्या लोकांनी केला आहे.