अहमदनगर जिल्ह्यातील युवा वैज्ञानिकाचा अटकेपार झेंडा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘अणुऊर्जा क्षेत्रातील विविधता’ (Diversity in Nuclear) या विषयावर आधारित असणारी आंतरराष्ट्रीय अणुविद्युत युवा परिषद (International Youth Nuclear Congress) IYNC-2020 नुकतीच सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे ८-१३ मार्च दरम्यान पार पडली. ही परिषद प्रत्येक दोन वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवली जाते. सिडनी येथे झालेल्या परिषेमध्ये जगभरातील तब्बल चाळीसहून अधिक देशांनी आपला सहभाग नोंदवला.
भारतातील सात युवा संशोधकांनी व वैज्ञानिकांनी प्रथमच या परिषेमध्ये सहभाग नोंदवून आपल्या कामाची छाप पाडली व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र श्री. ज्ञानेश्वर अवसरे (अरणगाव, ता. जामखेड) यांनी भारतीय चमूचे नेतृत्व केले. श्री. अवसरे यांनी या परिषदेमध्ये टेक्निकल ट्रॅक मॅनेजर, टेक्निकल पेपर समीक्षक म्हणून काम पाहिले. याच परिषदेमध्ये श्री. अवसरे यांनी ‘The Indian Young Generation-Gurantors for the future of Nuclear Energy’ या विषयावरचा आपला शोधनिबंध सादर केला. त्यांच्या या कार्याला आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) प्रतिनिधी श्री. वेई हुयांग यांनी उत्कृष्ठ कार्य म्हणून दाद दिली व त्यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
श्री. ज्ञानेश्वर अवसरे यांनी IYNC च्या धर्तीवर ‘इंडियन यंग जनरेशन इन न्युक्लिअर (IYGN)’ या संस्थेची (एनजीओ) स्थापना केली असून ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. भारतातील तरुण पिढीला अणुऊर्जेविषयी असलेल्या गैरसमजुती दूर करून त्यांना या क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असलेल्या संशोधनाच्या व रोजगाराच्या संधी बद्दल माहिती देणे, त्यांना अणुऊर्जेचे महत्त्व समजावणे अशा अनेक गोष्टींवर ही संस्था काम करते.
जानेवारी-२०१९ पासून अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती (युएई), येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करत येणाऱ्या अणु केंद्रामध्ये श्री अवसरे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी २००८ पासून त्यांनी भारतीय अणुऊर्जा विभागाच्या (NPCIL) तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या (TAPS) मुख्य नियंत्रण कक्षात नियंत्रण अभियंता (वैज्ञानिक अधिकारी) म्हणून काम केले आहे.
२००७ मध्ये लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील ‘सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी (Best Student)’ सन्मानाने मा. राज्यपालांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे त्यांना गौरवण्यात आले होते.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आपल्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविणाऱ्या श्री. ज्ञानेश्वर अवसरे यांचे जगभरातून कौतुक होत आहे.
“भारतासारख्या विकसनशील देशाला प्रगत होण्यासाठी विद्युत ऊर्जेची नितांत गरज आहे. माझ्या मते अणुऊर्जा ही गरज बऱ्याच मोठ्या प्रमाणात भागवू शकते. देशातील तरुण पिढीला या क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. IYNC2020 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. या यशापर्यंत पोहचण्यासाठी खडतर परिस्थितीत मला शिकवणाऱ्या, माझ्यावर संस्कार करणाऱ्या माझ्या आई वडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे. तसेच मला सदैव मदत व मार्गदर्शन करणारे माझे सहकारी, मित्रमंडळी, शिक्षक व गावकरी या सर्वांचा मी आभारी आहे”- – ज्ञानेश्वर अवसरे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24