जामखेड शहरासाठी ११७ कोटींची पाणीयोजना मंजूर!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड : जामखेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोत्थान महाअभियानांतर्गत ११७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. याबाबत मंजुरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत पालकमंत्री प्रा. राम शिंदे व नगराध्यक्ष निखिल घायतडक यांना दिले.

यामुळे जामखेड शहरापुढील तीस वर्षांपर्यंतचा पाणीप्रश्न मिटणार आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून जामखेड तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्य भुतवडा तलावातील पाणी कमी पडत होते. तसेच अपुऱ्या पावसामुळे तलाव उन्हाळ्यात कोरडा पडत होता. त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला होता.

सध्या शहरात २८ टँकर व काही खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहराचा पणीप्रश्न कायमस्वरुपी मिटावा, अशी नागरिकांची मागणी होती. पालकमंत्री शिंदे हेदेखील गेल्या दोन वर्षांपासून नगरविकास खात्याकडे मागणी करत होते.

ही मागणी लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोत्थान महाअभियाना अंतर्गत ६४ किमी लांबीची ११७ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री जामखेड दैऱ्र्यावर आले असता,

त्यांनी या पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीचे पत्र नगराध्यक्ष निखिल घायतडक यांना दिले. त्यामुळे शहरातील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. करमाळा तालुक्यातील दहेगाव ते जामखेड, अशी ६४ किमी. अंतर असलेली ही पाणीपुरवठा योजना असून, दहेगाव येथील उजनी बॅकवॉटरमधून ३५० एचपी मोटारीने पाणीउपसा करून करमाळा येथे आणण्यात येणार आहे.

तेथून जवळा ,नान्नजमार्गे ग्रॅव्हिटीने हे पाणी जामखेडजवळील चुंबळी येथे बंद पाईपलाईनद्वारे आणण्यात येणार आहे. चुंबळी येथे जलशुद्धीकरण केंद्र तयार करून नंतर पुढे पाईपलाईनद्वारे शहरात व उपनगरांतील नागरिकांना पाणीपुरवठा केला ज़णार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24