अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळूमाफिया विरोधात पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करुन देखील आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ टायगर फोर्स प्रणित एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दि.17 जुलै रोजी वाळूमाफीयांच्या टेम्पोने चुकीच्या दिशेने येऊन मडकी (ता. नेवासा) येथे बैलगाडीला उडवून पळ काढला. सदर टेम्पोचालक महेश (काळ्या) आढागळे ओळखीचा निघाल्याने त्याच्याविरोधात नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर सदर टॅम्पोचालक व मालक असलेला वाळूतस्कर यांच्यावर पोलीसांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही.
या घटनेतील टेम्पो जप्त करण्यात आली नाही व फिर्यादीप्रमाणे आरोपींना देखील अटक करण्यात आले नसल्याचे रामनाथ नाचन यांनी निवेदनात म्हंटले आहे. आरोपींना अटक करुन न्याय मिळण्याच्या मागणीसाठी नाचन यांनी आपल्या कुटूंबीयांसह एकलव्य संघटनेच्या वतीने गुरुवार दि.22 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
तर वंचित घटाकातील व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी एकलव्य संघटना नाचन कुटुंबीयाच्या पाठीशी असल्याचे जिल्हा संघटक शिवाजी थोरात व भाऊसाहेब सुरशे यांनी सांगितले आहे.