नवी दिल्ली : देशातील बाजारात कांदा पुरवण्यासाठी पाकिस्तानचा कांदा खरेदी करणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील बाजारात कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रणासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातून दोन हजार टन कांदा खरेदी करण्याची निविदा जारी केली होती.
ही निविदा ५ सप्टेंबरला काढण्यात आली असून २४ सप्टेंबरपर्यंत भरली जाऊ शकते. याव्यतिरिक्त सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्यही ८५० डॉलर प्रतिटन केले आहे. मात्र, परवा रात्री उशिरा एमएमटीसी लिमिटेडने यात बदल करत पाकिस्तानचा कांदा खरेदी करणार नसल्याचे म्हटले आहे.
कांदा आयात करण्यासाठी अधिकृत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एमएमटीसी लिमिटेडने दोन हजार टन कांदा आयात करण्यासाठी निविदा जारी करताना म्हटले होते की, कांदा गुणवत्तापूर्ण तसेच पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान अथवा अन्य कोणत्याही देशातील असावा.
मात्र, परवा रात्री उशिरा निविदेमध्ये बदल करत, एमएमटीसी लिमिटेडने म्हटले की, ‘आयात करण्यात येणारा कांदा पाकिस्तानमध्ये उत्पादित झालेला नसावा. संबंधित कंपन्यांना कांद्याचा पुरवठा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करावा लागेल. सामान्यपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करणाऱ्या विदेशी कंपन्या पाकिस्तानचा कांदा खरेदी करून भारतीय बाजारात पाठवतात.