श्रीगोंदा : मागील पाच वर्षाच्याकाळात घोड, कुकडीच्या पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आपण ही निवडणूकच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाण्याच्या मुद्यावर लढवत आहोत. असे प्रतिपादन बबनराव पाचपुते यांनी केले.
यावेळी बाजारात मुस्लिम व्यापाऱ्यांनीही पाचपुते यांचे मिठाई भरवूनस्वागत केले. दादाच आमचा पक्ष असल्याने तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे म्हणाले. श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारात जनतेने आघाडी घेतली आहे.
सोमवारी श्रीगोंद्याचा आठवडे बाजार होता. यावेळी बाजारासाठी आलेल्या खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांशी पाचपुते यांनी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे काही दिवस उरले असतानाप्रचारात दिवसेंदिवस रंगत वाढू लागली. सोमवारी श्रीगोंद्याचा आठवडे बाजार असल्यामुळे पाचपुते यांनी बाजारातून फेरी काढली.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी झालेली शेतीची वाताहत त्यांना सांगितली. हे सर्व सांगताना मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. कारण मोठ्या कष्टाने उभा केलेल्या फळबागा,ऊस डोळ्यासमोर पाण्याअभावी जळून जात होता.
मात्र शेतकऱ्यांच्या मदतीस कोणीच आले नाही. अशी खंत व्यक्त केली.परंतु आता यापुढील काळात परत अशी वेळ येवू नये, यासाठी पाण्याच्या मुद्यावर दादांच्या पाठीशी उभे राहू.असा निर्धार केला.