मुंबईत शिक्षकांवर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीमारचा निषेध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- मुंबई येथील आझाद मैदानावर न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या शिक्षकांवर पोलीसांनी अमानुष लाठीमार करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

तर आंदोलन करणार्‍या शिक्षकांच्या मागण्या मान्य करुन संबंधीत पोलीस अधिकार्‍याचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिक्षक परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

राज्यातील अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करून अनुदान देण्याबाबत तसेच 20 टक्के अनुदान मंजूर केलेल्या शाळांना प्रचलित नियमानुसार वाढीव अनुदान टप्पा देण्याबाबत मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण व धरणे आंदोलन सुरु होते.

या आंदोलनाची दखल न घेता राज्य सरकारने पोलीस यंत्रणेला हताशी धरुन सोमवार दि.26 ऑगस्ट रोजी शिक्षकांवर अमानुष लाठीमार केला. यापूर्वीसुद्धा ऑक्टोबर 2016 मध्ये औरंगाबाद येथे शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला होता.

शिक्षकांनी न्यायहक्कासाठी केलेली आंदोलने पोलिस बळाचा वापर करून राज्य सरकार धडपडण्याची नीती स्विकारत असल्याचा आरोप शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी केला आहे.

तर शिक्षक परिषदेच्या वतीने विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करीत आंदोलन स्थळी जाऊन शिक्षकांना पाठिंबा देण्यात आला.

यावेळी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, आ.डॉ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे उपस्थित होते. समाजात शिक्षकांचा आदराने सन्मान केला जातो.

मात्र त्यांच्या न्यायहक्काच्या मागण्या न सोडविता आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात असताना सरकारला लाज वाटत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24