अहमदनगर जिल्ह्यातील बळीराजा दुहेरी संकटात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- शेवगाव तालुक्याच्या दक्षिण भागासह परिसरात बोंडआळी आणि आता रस शोषक किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यात मका बाजरी व ज्वारी पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके डोळ्या देखत नष्ट होत आहेत. त्यातच भर म्हणून की काय कांदा पिकाला हुमनीने पोखरण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या अक्षरक्षा तोंडचे पाणीच पळाले आहे.

या भागात जूनच्या शेवटी पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. परंतु बोंड आळी आणि आता ढगाळ हवामानाच्या परिणामामुळे कपाशी पिकाची पूर्वीपासून वाढ खुंटली असून, कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता जानकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान ऑगस्ट नंतरचा कपाशीचा जोम काही प्रमाणात चांगला असताना मध्यंतरीच्या बखाडीने त्यावर काजळी आली.

परंतु पुन्हा सुरु झालेल्या पावसाने त्याला चकाकी आणण्याचे काम केले, मात्र सततचे ढगाळ वातावरण आणि पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे त्यावर रसशोषक किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशीचे पाने लाल पडत असून पाते गळती होत आहे.

तर दुसरीकडे त्याची उंचीही खुंटली आहे.त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास नियतीने हिरावुन घेण्याचे काम केल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत. पांढऱ्या सोन्याचे आगार शाबुत ठेवण्यासाठी कृषी विभागाची जोड असणे व वेळोवेळी मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

कापसापाठोपाठ बाजरी पिकासह मका, ज्वारी पिकांवरही लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून पाने,कणसेच आळीने फस्त केले आहेत. अत्यल्प पावसामुळे कपाशी पिके तर गेलीच आता रब्बी हंगामातील ज्वारी पिकांवर फवारणी करण्याचे आस्मानी संकट शेतकऱ्यांनसमोर उभे ठाकले आहे. कांदा पिकांवरही हुमनीच्या अळीने घात केला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24