नेवासे :- ज्ञानेश्वर मंदिरामागील कापूरडोह येथे प्रवरानदीत गुरुवारी वाहून गेलेल्या सोमनाथ गांगुर्डे (३०, मारूतीनगर) या तरुणाचा मुतदेह ७५ तासांनी रविवारी दुपारी नदीपात्रात सापडला.
मुसळधार पाऊस व मुळा धरणातून सोडलेले पाणी यामुळे आलेल्या पुरामुळे मुळा व प्रवरा नदीवरील तिन्ही बंधारे ओव्हरफ्लो झाले होते. १५ सप्टेंबरनंतर सर्व फळ्या टाकल्याने बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला होता.
पुराच्या पाण्यात गुरुवारी दुपारी गांगुर्डे हा तरुण वाहून गेला. त्याचा शोध चालू होता. मध्यमेश्वर बंधाऱ्यापर्यंत शोध घेऊनही तो सापडला नव्हता.
मध्यमेश्वर बंधाऱ्यातील फळ्या मोकळ्या करून पाणी सोडल्याने पातळी कमी झाली. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सोमनाथचा मृतदेह ज्ञानेश्वर मंदिरामागील नवीन बंधाऱ्याजवळ जलपर्णीच्या पानंदीत सापडला.