श्रीगोंदा : अतिशय चुरशीच्या झालेल्या श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपचे बबनराव पाचपुते यांनी आघाडी मिळवली आणि पाचपुते हे अटीतटीच्या लढाईत विजयी झाले. पाचपुतेंच्या विजयामुळे श्रीगोंद्यात पहिल्यांदाच विधानसभेला कमळ फुलले आहे.
निकाल लागल्यानंतर बबनराव पाचपुते व त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते या दोघांनी तातडीने मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या भाजप नेत्यांची भेट घेतल्यामुळे आता तालुक्यात नवीन चर्चाना उधाण आले असून, पाचपुते यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे पाचपुते यांच्या रूपाने परत श्रीगोंदा तालुक्याला परत एकदा लाल दिवा मिळणार का याबाबत विविध चर्चा सुरू झाली आहे. . या निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपची वाताहात झाली त्यातही पाचपुते हे काही मतांनी का होईना पण निवडून आले आहेत.
तसेच पालकमंत्री असलेले राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव झालेला आहे. त्यामुळे दक्षिणेतून पाचपुते हेच मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.त्यातच बबनराव पाचपुते हे सध्या विधानसभेतील जेष्ठ विधानसभा सदस्य असून, त्यांना विधिमंडळाच्या कामाचा तसेच मंत्रिपदाच्या कामकाजाचा देखील अनुभव आहे.
तसेच पाचपुतें हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे मुख्यमंर्त्यांकडून पाचपुते यांच्या मंत्रीपदाला हिरवा कंदील मिळण्याची श्यक्यता आहे. त्यामुळे आता बबनराव पाचपुते यांच्या रूपाने पुन्हा एकदा श्रीगोंदयाला लाल दिवा मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तसेच पाचपुते यांना हांगामी विधानसभा अध्यक्षपद दिले जाणार असल्याची चर्चा पाचपुतें समर्थक करत आहेत. तशा पोस्ट देखील सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत. यामुळे आता पाचपुतें ना कोणते पद मिळते याबाबत कार्यकर्त्यांसह तालुक्यातील जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.