श्रीरामपूर :- तालुक्यातील भेर्डापूर शिवारात भेर्डापूर-पाथरे रस्त्यावरील अजिंक्यतारा हॉटेलमधील कूक मोहमंद शेख याचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. या कूकचा मृतदेह रविवारी हॉटेलच्या मागेच पडलेला आढळला.
पोलिसांनी याच हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या एकास संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. दुपारी उशिरा या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाले. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यात मोहंमद शेख याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक मसूद खान, सतीश गोरे आदी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू होते. पोलिस सखोल चौकशी करत आहेत. खुनाचे निश्चित कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.