कोलकाता: पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या डोक्याला रविवारी जखम झाली.
बराकपूरचे पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी मारहाण केल्यानेच आपल्या डोक्याला मोठी जखम झाली, असा आरोप सिंह यांनी केला आहे. खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले की, श्यामनगर येथील भाजपच्या कार्यालयाचा ताबा घेतल्याच्या मुद्द्यावरून आम्ही ‘शांततेने’ निदर्शने करत होतो.
त्या वेळी वर्मा यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने आमच्यावर हल्ला केला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मात्र वर्मा यांचा आरोप फेटाळून लावला. या अधिकाऱ्याने सांगितले की, कांकीनारा येथे दोन गटांमध्ये झालेल्या चकमकीच्या वेळी दगडफेक झाली.
या दगडफेकीत सिंह यांना जखम झाली. स्थानिक सूत्रांनी सांगितले की, पोलिस अधिकारी घटनास्थळी येताच रास्ता रोको करणाऱ्या जमावाने त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. त्यामुळे रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिस पथकाने जमावावर लाठीमार केला.
श्यामनगर आणि कांकिनारा हे दोन्ही भाग बराकपूर लोकसभा मतदारसंघात येतात. अर्जुन सिंह हे या मतदारसंघाचे खासदार आहेत. सिंह हे आधी तृणमूल काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
तेव्हापासून अनेक भागांत हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. श्यामनगर येथील भाजपच्या कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांच्या समर्थकांत रविवारी चकमक उडाली, अशी माहितीही सूत्रांनी दिली.