श्रीरामपूर ;- काँग्रेस पक्षाचे उमेदवार लहु कानडे हे फक्त निवडणूकीपुरते श्रीरामपूर मधे येतात व निवडणूक संपली की गायब होतात. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्याचे व जनतेचे प्रपंच टिकवायचे असेल तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन मा. आ. भानुदास मुरकुटे यांनी खोकर येथे काल सायंकाळी पार पडलेल्या प्रचार सभेत बोलताना केले.
यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, लोकसेवा विकास आघाडीचे हिंमतराव धुमाळ, अशोकचे उपाध्यक्ष पोपटराव जाधव, बाबासाहेब काळे, अभिषेक खंडागळे, गोराणे बाबा, पंढरीनाथ पटारे, सदाशिव पटारे, शिवसेनेचे कैलास भणगे आदींसह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुरकटे म्हणाले की, हक्काचे पाणी मिळवण्यासाठी व पाण्यासाठी संघर्ष करण्यासाठी तालुक्यातीलच आमदार पाहिजे. कांबळे हे तालुक्यातीलच असूनजनतेचे ऐकणारे आहेत तर काँग्रेस पक्षाकडून उभे असलेले उमेदवार हे श्रीरामपूरचे नसुन ते फक्त निवडणूक आल्यावरच श्रीरामपूरला येतात.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत कानडे श्रीरामपूरमधे आले, निवडणूक लढविली त्यात पराभव झाला व त्यावेळी जे गायब झाले ते आता पुन्हा निवडणूक आल्यावरच परत आले. या दरम्यानच्या काळात श्रीरामपूर तालुक्यातील जनतेसाठी कानडे यांनी एकही प्रश्न मांडला नाही की कुठले आंदोलन केले नाही.
त्यामुळे कांबळे हे कायम मतदारसंघात असणारे उमेदवार आहे, आता सत्तेत आल्यावर जास्त पटीने त्यांच्यामार्फत विकास कामे होतील. मागिल पंचवार्षिक मधे कांबळे हे सत्ताधारी पक्षाचे नसल्याने विकास कामे करण्यातअडचणी आल्या,
परंतु आता शिवसेना पक्षात गेल्याने तसेच ना. विखेंची साथ असल्याने जास्त विकास कामे आ. कांबळे करतील आणि काम नाहीच केले तर आमची आणि उद्धव ठाकरेंची हॉटलाईन आहेच असा टोलाही मुरकुटे यांनी लगावला भंडारदराचे पाणी,
समन्यायी पाणी वाटप कायदा, ओझरपर्यंत नव्याने झालेले २९ प्रोफाइल वॉल या आणि अशा अनेक संकटांना सामोरे जाण्यासाठी आम्ही आ. कांबळे यांना पाठींबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.