आमदार रोहित पवारांकडून अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील अतीवृष्टी झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या परतीची पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यामध्ये मका, बाजरी,ज्वारी, कांदा, सोयाबीन, ऊस आदी पिके अतिरिक्त पावसाने वाया गेली आहेत. फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने रानात तुडुंब पाणी साठले असल्याने अनेक पिके सडून गेली आहेत.

मात्र, शासन स्तरावरून वेगवेगळे निकष लावून शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पूर्ण भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली.

या वेळी आ. पवार यांनी खेड येथील रामदास मोरे यांच्या नुकसानग्रस्त कांदा पिकाची पाहणी करत संवाद साधला. पावसाने कांदा पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे मोरे यांनी सांगितले. शासन स्तरावरून निश्चितच नुकसानभरपाई मिळेल, असा विश्वास रोहित पवार यांनी दिला.

आ. पवार यांनी औटेवाडी, आखोणी, करपडी, बाभुळगाव, येसवडी, बारडगाव, भांबोरा, दुधोडी, राक्षसवाडी, धालवडी, कुळधरण, कोपर्डी, शिंदे, नांदगाव, रेहकुरी, माहिजळगाव आदी ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

हेमंत मोरे, बाळासाहेब मोरे, रामदास मोरे, महादेव मोरे, ॲड. सुरेश शिंदे, नितीन धांडे, कुलदीप मोरे, ॲड. युवराजसिंह राजेभोसले, सतीश मोरे, सचिन कापसे तसेच कृषी विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24