गोंदा : अवघ्या एक तासापूर्वी जन्मलेल्या जनजात अर्भकावर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात या जवजात अर्भकाचा मृत्यू झाला तर त्या अर्भकाची आई जखमी झाली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे शनिवारी घडली.
याबाबत सविस्तर असे की, मौजे कर्जत (तालुका.मावळ, जिल्हा.पुणे) येथील मूळचे रहिवाशी असलेले, गुलाब पप्पू कोली गेल्या एक दीड महिन्यापासून कुटुंबासह पेडगाव येथे कोळसा बनवण्याचे काम करीत आहेत. कोली यांची पत्नी शनिवारी सकाळी दहा वाजता प्रसूत झाली. त्यांना मुलगा झाला.त्यामुळे ते नवजात अर्भक व आई झोपडीत झापले होते.
दुपारच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक थेट झोपडीत घुसून त्या चिमुल्याचे लचकेच तोडले यात त्याचा मृत्यू झाला तर आई जखमी झाली आहे. याबाबत गुलाब कोली यांच्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिच्या हातावर व पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे.
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात बहुतेक ठिकाणी मोकाट कुर्त्यांच्या हल्यात अनेक लहान मुलांसह वृृद्ध जखमी होत आहेत. त्याचसोबत शेळ्या मेंढ्यांसह पाळीव जनावरे देखील त्यांची शिकार होत आहेत. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत,नगरपालिकेच्या प्रशासनाने या मोकाट कुर्त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी यानिमित्त समोर येत आहे.