हिंदू विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील दंतवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका हिंदू तरुणीचा हॉस्टेलच्या खोलीत संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे.

तरुणीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे; परंतु आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबाकडून लावण्यात आला आहे.

लरकाना जिल्ह्यातील बीबी आसिफा दंतवैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असलेली नम्रता चांदनी सोमवारी आपल्या पलंगावर मृतावस्थेत आढळली. सुरुवातीला चांदनीच्या मैत्रिणीने खोलीच्या बाहेरून अनेक वेळा तिला आवाज दिला.

मात्र, दरवाजा उघडला जात नसल्याने घाबरलेल्या मैत्रिणीने पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर नम्रताचा मृतदेह पलंगावर आढळला. तिच्या गळ्याला एक दोरी बांधण्यात आलेली होती.

खोलीचा दरवाजादेखील आतमधून बंद होता. विशेष म्हणजे नम्रता मुळात ज्या भागात राहते त्या घोटकीमध्ये रविवारी समाजकंटकांनी मंदिरासह अनेक स्थळांची तोडफोड केली होती. या प्रकरणी दंगल करणाऱ्या २१८ जणांविरोधात पोलिसांनी तीन गुन्हेदेखील दाखल केले होते.

त्यामुळे नम्रताच्या मृत्यूचा तपास या दृष्टिकोनातूनसुद्धा केला जात आहे. नम्रताने आत्महत्या केल्याचा दावा पोलीस व महाविद्यालय प्रशासनाकडून केला जात आहे; परंतु नम्रताचा भाऊ विशाल याने प्राथमिक तपासात तिची हत्या करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

ही आत्महत्या नाही. आत्महत्येचे व्रण वेगळे असतात; पण मला तिच्या गळ्याभोवती वायरचे व्रण दिसून आले. तिच्या हातावरदेखील संशयास्पद व्रण आढळल्याचे विशालने म्हटले आहे. तर नम्रताच्या मृत्यूभोवती बळजबरीच्या धर्मांतराचे कारण असण्याची शक्यतादेखील व्यक्तकेली जात आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24