चाराच उठला जनावरांच्या जिवावर!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- जनावरांचे खाद्य म्हणून पेरलेल्या हिरव्या चाऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावरे दगावत असल्याने पशुपालक हवालदिल झाल्याचे दिसत आहेत. हा हिरवा चाराच जनावरांच्या मुळावर उठला आहे.

चालू खरीप हंगामात सोयाबीन, मूग व मका ही पिक पावसाअभावी आली नाहीत तर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हाती आलेली पिके वाया गेली आहेत. किटकनाशकांची फवारणी करूनही परिणाम होत नसल्याने संपूर्ण पिकच हातातून गेले आहे.

महागडया फवारण्यांचाही परिणाम निष्फळ ठरत असल्याने शेतकरी लष्करी अळीला वैतागले आहेत. लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेली मका ज़नावराने खाल्ल्यास शेतकऱ्यांची जनावरे दगावत आहेत. त्यामुळे पशुपालक भयभीत झाले आहेत. दुष्काळामुळे ज्वारीचा कडबा सामान्य शेतकऱ्यांना विकत घेणे परवडत नाही.

पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मका पेरली; परंतू याच पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला असून, ही मका जनावरांना खाऊ घातल्यास जनावरे दगावत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने पशु – पालकांचे धाबे दणाणले आहेत.

रासायनिक खते व विषारी कीटकनाशकांच्या अती वापरामुळे अळया खाणाऱ्या पक्षांची संख्या कमी झाल्याने अशा जिवघेण्या अळयांचा प्रादुर्भाव वाढत असून, हा हवामान बदलाचा संकेत असल्याचे मत तज़्ज्ञ व्यक्त करत आहेत. शेतकरी घेत असलेल्या विविध पिकांना त्यांच्या वाढीबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत असते.

परंतू चारा पिकाची लागवड करणारे शेतकरी कमी असल्याने या वैरणीबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे चारा पिकांबाबात मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे या घटनेवरून दिसते. जनावरांना शेतकरी जेव्हा चारा टाकतात, तेव्हा तो कापून लगेच ओला न टाकता कापलेला हिरवा चारा वाळवावा व नंतरच जनावरांना टाकावा,त्यामुळे जनावरे दगावणार नाहीत, असा सल्ला पशुवैद्यकीयक अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24