साकुरी : अहमदनगर-मनमाड हा महामार्ग २ खासदार आणि ४ आमदारांच्या मतदारसंघातून जातो. तीन टोलनाक्यांवर रोज लाखो रुपये गोळा केले जात असताना कोपरगाव ते बाभळेश्वरपर्यंत दोन्ही बाजूंनी शेकडो खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.
साईभक्त व प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तिच परिस्थिती निमगाव ते निर्मळ पिंपरी बायपासची झालेली आहे. सरकार एकीकडे खड्डेमुक्त महाराष्ट्राचा गाजावाजा करीत असताना सरकारची ही घोषणा किती पोकळ आहे याचा अनुभव रोज अनेक वाहनचालक, साईभक्त व प्रवासी घेत आहेत.
संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनाही याचे काहीही सोयरसुतक दिसत नाही, अशीच काहीशी परिस्थिती आहे. नगर-मनमाड वरील कोपरगाव ते मनमाड दरम्यान रस्ता तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये पाच वर्षांत खर्च केले गेले.
जुना रस्ता चांगला असताना नवीन रूंदीकरण केलेला रस्ता अनेकवेळा खचताना दिसत आहे. दोन-चार मोठ्या पावसात या रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. हे मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून दुचाकी व चारचाकी यांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
अवजड वाहनांना होणारा त्रास, त्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान याचा अंदाज करणे अवघड आहे. निमगाव ते पिंपरी निर्मळ बाह्यवळण रस्त्यासाठीही कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. अनेक ठेकेदार राजाश्रयाच्या जोरावर मालामाल झाले.
मंजूर रस्ता, या ठिकाणी बांधलेले पूल, अनेक ठिकाणी लहान-मोठा झालेला हा मार्ग बघितल्यावर या कामात किती मोठा अपहार झाला आहे याचा अंदाज येतो, असा आरोप शिवसेनेचे संघटक विजय काळे यांनी केला आहे.