विकासकामांचा धसका घेत विरोधकांनीच त्यांच्या पक्षबदलाच्या अफवा पसरवल्या!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे पक्ष बदलणार असल्याची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असून जगताप कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. ते राष्ट्रवादीत आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

जगताप यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा धसका घेत विरोधकांनीच त्यांच्या पक्षबदलाच्या अफवा पसरवल्या आहेत, असा आरोप देखील विधाते यांनी यावेळी केला. जगताप यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेने शहरात राजकीय घडामोडींना वेग आला होता.

जगताप शिवसेना अथवा भाजपमध्ये प्रवेश करणार असे बोलले जात होते. त्यामुळेच जगताप यांच्या हजारो समर्थकांनी दहिहंडीच्या कार्यक्रमात जय भवानी.. जय शिवाजी अशी नारेबाजी केली होती. त्यापूर्वी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या काही बैठकांना दांडी देखील मारली होती.

त्यातच त्यांच्या सोशल मिडिया वॉरमध्ये पक्षाचे चिन्ह घड्याळ कुठेच दिसत नव्हते. या सर्व कारणांमुळे जगताप कोणत्याही क्षणी बक्ष बदलणार असा विश्वास अनेकांना होता. मात्र, पक्षबदलाची चर्चा सुरू असताना जगताप यांनी कधीच त्याबात भाष्य केले नाही.

मी राष्ट्रवादीतच असल्याचे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले. असे असले तरी जगताप शिवसेनत प्रवेश करणार असल्याच्या भितीने शिवसेना उपनेते अनिल राठोड व त्यांचे समर्थक धास्तावले होते. काही झाले तरी जगताप यांना सेनेत प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी सेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

या सर्व घडामोडीनंतर जगताप यांच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी थेट पत्रकार परिषद घेऊनच जगताप यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेबाबत जाहीर खूलासा केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24