पाथर्डी :- विकास काय असतो हे आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून दाखवतो. केवळ नारळ फोडून विकास होत नाही, अशी खरमरीत टीका केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व पाथर्डी बाजार समितीचे संचालक प्रताप ढाकणे यांनी आमदार राजळे यांचे नाव न घेता केली.
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ता डांबरीकरण, बैल बाजाराचे सुशोभीकरण व तिसगाव उपबाजार समिती येथील ८६ लाखांच्या एक हजार मेट्रिक टन क्षमता असलेल्या गोडाऊनचे भूमिपूजन करताना अॅड. ढाकणे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती बन्सीभाऊ आठरे होते. यावेळी उपसभापती मंगल राजेंद्र गर्जे, उद्योजक किरण शेटे, माजी जि. प. सदस्य शिवशंकर राजळे, बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे, बाळासाहेब घुले, विष्णू सातपुते,
नारायणबापू धस, सीताराम बोरुडे, योगेश रासने, समितीचे सचिव दिलीप काटे, बाळासाहेब बोरुडे उपस्थित होते. आमदार राजळे यांच्यावर निशाणा साधत ढाकणे म्हणाले, सहकारी संस्था कशा चालवायच्या जे आम्हाला शिकवत होते, त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांची काय अवस्था आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
तुमच्या काळात बाजार समितीची सत्ता असताना संस्थेला तोट्यात नेऊन घालायचं काम तुम्ही केले. पूर्वीची सगळी घाण साफ करायला आम्हाला दोन-अडीच वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर सगळ्या संचालक मंडळाने योग्य आर्थिक नियोजन केल्याने तोट्यातील संस्था नफ्यात आणून दाखवली. विकास काय असतो तो आम्ही प्रत्यक्षात काम करून दाखवतो.