सोलापूर : सीबीआय, आयबी, ईडी या देशातील महत्त्वाच्या यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना संकटात आणण्याचा उद्योग सुरू आहे. मलाही असा त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र असल्या ईडी-बिडीचा दम आम्हाला देऊ नका. ईडीला येडं केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला आहे.
सध्याच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा चौथीच्या पुस्तकातील धडाच काढून टाकला. हातात लेखणी आली की काय गडबड करायची, याचा अनुभव असल्याने आता ते इतिहाससुद्धा बदलतील आणि खोटा इतिहास त्या ठिकाणी आणतील. अशा प्रवृत्ती सत्तेपासून दूर करण्याचा निकाल आपण सर्वांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.
५ वर्षांपूर्वी ज्यांचं कोणाला नाव माहिती नव्हतं, ते अमित शहा सोलापुरात येऊन विचारतात की ‘पवारांनी काय केलं ?’ त्यांनी या महाराष्ट्राचा इतिहास पाहिला पाहिजे. कै. यशवंतराव चव्हाण यांची विकासाची विचारधारा घेऊन जाणारा हा महाराष्ट्र आहे. त्यानुसार काम करताना आम्ही देशात पहिल्यांदा महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
अठरापगड जातींना अधिकार दिले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नांव दिलं. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. याउलट भाजपा सरकारने काय केलं ते सांगावं.
महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ शुक्रवारी येथील शिवतीर्थावर जाहीर सभा झाली. याप्रसंगी पवार बोलत होते. या वेळी केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवताना पवार म्हणाले, सत्तेचा गैरवापर करून ही मंडळी विरोधकांना त्रास देत आहेत.
सीबीआय, आयबी, ईडी या देशातील महत्त्वाच्या यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना संकटात आणण्याचा उद्योग सुरू आहे. मलाही असा त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र मी ईडीला येडं केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या मातीला दिल्लीसमोर नमायचं माहीत नाही. हा इतिहास समोर ठेवून सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यांनी घोषणा केलेल्या अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाची एक वीटही पाच वर्षात रचली नाही.
इंदू मिलच्या जागेत डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे काहीही झालेलं नाही. हजारो उद्योग बंद पडत आहेत. नोकऱ्या देतो, मात्र यांनी हजारोंच्या नोकऱ्या घालवल्या. महाराष्ट्राच्या ज्या गड-किल्ल्यांचा, त्यावर छत्रपती शिवराय आणि मावळ्यांनी दाखवलेल्या शौर्याचा सर्वांना अभिमान आहे, त्या किल्ल्यांवर सध्याचे सरकार दारूचे बार, हॉटेल आणि छमछमची व्यवस्था करण्याचा निर्णय घेत आहे.
आपला इतिहास बदलून खोटा इतिहास आणण्याची भाषा हे बोलत आहेत. नव्या पिढीचे चारित्र्य घडवायचे असेल तर त्यांच्यापुढे आदर्श असला पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांइतका मोठा आदर्श दुसरा नाही. त्यादृष्टीने पूर्वीच्या सरकारने प्राथमिक शिक्षणाच्या पुस्तकांमध्ये त्यांच्यासह महापुरुषांचे धडे दिले. मात्र हे सरकार धडे काढून टाकत आहे. आता त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, असेही पवार यांनी नमूद केले.