मला खासदार करण्यात नागवडे कुटुंबाचा मोठा वाटा- खा. विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा : जिल्ह्यात शब्दाला जगणारा माणूस म्हणजे कै.शिवाजीराव नागवडे होते. सध्या राजकारणात नैतिकता राहिली नाही. श्रीगोंद्यात काही लोक निवडणुकीच्या जीवावर आपली दुकानदारी चालवतात, विधानसभा निवडणुकीच्या जिवावर दिवाळीच्या खरेदीची तयारी केली आहे.

निवडणूक लागली की मतांच्या बाजारावर अनेकजण आपली पोळी भाजतात. मला खासदार करण्यात नागवडे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचा गौप्यस्फोट विखेंनी केला. तालुक्याच्या राजकारणात रोज धक्कादायक घडामोडी घडत आहेत.

त्यातच खा. विखे यांनी कट्टर विरोधक बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे यांच्या मनोमिलनासाठी प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काल नागवडेंच्या मेळाव्यात हजेरी लावत, नागवडे यांना भाजपात येण्याचे थेट आमंत्रणच देवून, एक प्रकारे त्यांची मनधरणी केली. ढोकराई फाटा आयोजित नागवडे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे यांनी अचानक एंट्री केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या..

यावेळी नागवडे म्हणाले की, विखे कुटुंबाने आम्हाला सतत मदत केली. निवडणूक जाहीर होईपर्यंत आघाडीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले. परंतु उमेदवारी दिली नाही, दहा दिवस आधी अचानक उमेदवारी करण्यास सांगितले. पाडापाडीचे, गलिच्छ राजकारण नागवडे कुटुंबाने कधी केले नाही. नगरपरिषदेसह घोड, कुकडी पाणी प्रश्न खा.विखेंनी लक्ष घालून मदत करावी लागेल.

साकळाई व तालुक्यातील प्रश्नांत लक्ष घालण्यासह नागवडे कुटुंबाला भविष्यात आमदार करण्याची जबाबदारी विखे यांनी घ्यावी.या गोष्टी मान्य करणार असतील तर ७ तारखेपर्यंत तुम्ही निर्णय कळवा अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणार. पाचपुतेंचे व आमचे कधी जमणार नाही.

त्यांच्या स्टेजवर जाणार नाही.हर्षवर्धन पाटील व विखे कुटुंबाशी बांधील राहून निर्णय घेऊ. राष्ट्रवादीने आम्हाला नेहमी चुकीची वागणूक दिल्याचे नागवडे म्हणाले.या सभेसाठी नगराध्यक्षा,नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24