पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

उत्तर प्रदेशातील हमीरपूर, छत्तीसगडमधील दंतेवाडा, केरळातील पाला व त्रिपुरातील बधरघाट विधानसभा मतदारसंघात गत सोमवारी विधानसभेची निवडणूक झाली होती. हमीरपूर येथे भाजपच्या युवराज सिंह यांनी आपले प्रतिस्पर्धी सप उमेदवार मनोज प्रजापती यांना पराभवाची धूळ चारली.

काँग्रेसने या मतदारसंघात दीपक निषाद व बसपने नौशाद अली यांना मैदानात उतरविले होते. ही जागा आमदार अशोककुमार सिंह चंदेल यांना हत्येच्या एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यामुळे रिक्त झाली होती.

नक्षलग्रस्त दंतेवाड्यातील पोटनिवडणुकीत जवळपास ६०.२१ टक्के मतदारांनी आपला मताधिकार बजावला होता. येथे तब्बल ९ उमेदवार मैदानात होते; पण खरा मुकाबला भाजप उमेदवार ओजस्वी मंडावी व काँग्रेस नेत्या देवती कर्मा यांच्यात होता.

त्यात कर्मा यांनी मंडावी यांना मात दिली. भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येमुळे ही जागा रिक्त झाली होती. भाजपने मंडावी यांच्या पत्नी ओजस्वी यांना येथे उमेदवारी दिली होती. केरळच्या पाला मतदारसंघात सत्ताधारी माकपप्रणीत ‘एलडीएफ’ आघाडीचा विजय झाला आहे.

पूर्वी ही जागा काँग्रेसप्रणीत ‘यूडीएफ’च्या ताब्यात होती. ‘एलडीएफ’ आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मणी सी. कप्पेन यांनी ‘यूडीएफ’च्या जोस टॉम पुलिक्कुनेल यांचा अवघ्या २,९४३ मतांनी पराभव केला.

काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ माजी अर्थमंत्री तथा केरळ काँग्रेसचे (एम) नेते के.एम. मणी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. मणी यांनी तब्बल ५ दशकांपर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान, त्रिपुरातील बधरघाट मतदारसंघात भाजपच्या मिनी मुजूमदार यांचा विजय झाला आहे. त्यांनी माकप उमेदवार बुल्टी बिस्वास यांचा ५,२७६ मतांनी पराभव केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24