जामखेड: उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांची झालेली गर्दी व त्यानंतर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, गावभेट दौऱ्यात महिलांचा सहभाग, मुस्लिम समाज व युवकांचा ओढा, यामुळे दिवसेंदिवस मला जनतेचे समर्थन वाढत आहे.
त्यामुळे २१ तारखेनंतर रोहित पवार मतदारसंघात दिसणार नाहीत, अशी टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी कली. तालुक्यातील नान्नज येथील उरे वस्ती येथे पालकमंत्री शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यानंतर कॉर्नर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
मंत्री शिंदे म्हणाले, मागील पाच वर्षांत मंत्रिपदाच्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला. यामुळे वीज पाणी रस्ते या मुलभूत समस्या सोडवल्या. आता पुढील काळात शेतीला शाश्वत पाणी मिळावे यासाठी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना राबवून तालुका दुष्काळमुक्त करणार आहे.
साखर कारखाना काढून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे तसेच सुत गिरणी मंजूर करून नऊ कोटीचा निधी मिळवून दिला. महिला आर्थिकदृष््ट्या सक्षम होतील यासाठी बचतगटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मतदारसंघात जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता आता मतदारांनी ठरवले आहे. आमदारला मत द्यायचे की नामदाराला. विरोधकांनी या मतदारसंघात काय विकासकामे केली हे सांगावे. केवळ चॉकलेट, गोळ्या व पॅड वाटून मते मिळत नाही व येथील जनता या प्रलोभनाला बळी पडणार नाही. आपल्या कामावर जनतेचा विश्वास असल्यामुळे २१ तारखेला जनता दाखवून देणार आहे.