नवी दिल्ली : काँग्रेसने शनिवारी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाचे स्वागत करताना या दोन्ही राज्यांतील जनता भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी उतावीळ असल्याचा दावा केला.
‘या निवडणुकीत काँग्रेस शेतकरी समस्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी आदी लोकांचे प्रश्न घेऊन मतदारांना सामोरे जाईल,’ असे काँग्रेसने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. तद्नुसार, या दोन्ही राज्यांत २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक, तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
काँग्रेसने या निवडणुकीत जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली. काँग्रेसकडून त्याचे स्वागत. पक्ष तन, मन व ताकदीने या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहे.
काँग्रेस पूर्वीसारखीच या निवडणुकीतही पूर्ण उत्साहाने जनतेचे प्रश्न उपस्थित करेल,’ असे काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
‘काँग्रेस शेतकऱ्यांचे प्रश्न मांडेल. गत ३ महिन्यांत १५ लाख नोकऱ्यांवर आलेल्या गंडांतराचा मुद्दा उपस्थित करेल. तथापि, शेअर बाजारात लाखो कोटी रुपये बुडाल्याचा मुद्दाही जनतेपुढे मांडेल,’ असे ते म्हणाले.
‘झारखंडची जनताही निवडणुकीची प्रतीक्षा करत होती; पण आयोगाने त्यांची निराशा केली. ज्यांना राज्यांची निवडणूक एकाच वेळी घेता येत नाही ते एक देश एक निवडणुकीची बडबड करत आहेत,’ असे खेडा म्हणाले.
‘महाराष्ट्रात शेतकरी त्रस्त आहेत. आत्महत्येचा काळ विक्राळ झाला आहे. लोक सरकार बदलण्याची प्रतीक्षा करताहेत. हरयाणातही कायदा-सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. तिथेही लोक भाजपाला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी उतावीळ झालेत,’ असे ते म्हणाले.
या वेळी त्यांनी पी. चिदंबरम यांच्या अटकेवरूनही केंद्रावर निशाणा साधला. ‘एकीकडे माजी केंद्रीय मंत्र्याला विनापुरावा तुरुंगात डांबण्यात आले असून, दुसरीकडे, एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या आपल्या माजी मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे खेडा म्हणाले.