मृत समजून दफन करण्यात आलेली एक नवजात बालिका जिवंत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बरेली : मृत समजून दफन करण्यात आलेली एक नवजात बालिका जिवंत सापडल्याची आश्चर्यकारक घटना उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात उजेडात आली आहे. या बालिकेवर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून, तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

बरेलीच्या हितेशकुमार सिरोही नामक व्यक्तीला गत गुरुवारी कन्यारत्न प्राप्त झाले होते; पण दुर्दैवाने जन्मानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला. तद्नंतर हितेश सायंकाळी तिला दफन करण्यासाठी येथील एका स्मशानभूमीत गेला. तिथे तिच्यासाठी खड्डा खोदताना ३ फुटांच्या अंतरावर एक भांडे सापडले.

त्यांनी कुतूहलाने हे भांडे वर काढून त्याची पाहणी केली असता त्यात एक जिवंत नवजात मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. ती सापडली तेव्हा तिचा श्वास वेगाने सुरू होता. तद्नंतर या घटनेची खबर पोलिसांना कळवून तत्काळ तिला रुग्णालयात हलविण्यात आले.

तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांच्या मते, बालिकेच्या शरीरात संक्रमण झाले असून, तिच्या प्लेटलेट्सही कमी झाल्या आहेत. दुसरीकडे, पोलीस या मुलीला जिवंत दफन करणाऱ्या पालकांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी या भागात चर्चेचा विषय ठरली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24