वॉशिंग्टन : दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरही रात्री चांगली झोप न येणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शास्त्रज्ञांनी झोपेची गुणवत्ता वाढविण्यासाठी एक स्मार्ट ‘पायजमा’ तयार केला असून, हे वस्त्र झोपेत व्यक्तीच्या हृदयाचे ठोके व त्याच्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेवर आपल्या सेन्सर्सद्वारे सूक्ष्म नजर ठेवणार आहे.
याद्वारे मिळालेल्या डेटाचा वापर व्यक्तीच्या झोपेची गुणवत्ता वाढविण्यासाठी केला जाणार आहे.. अमेरिकेतील मेसाच्युसेट्स एमहर्स्ट विद्यापीठाच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वकाही सुरळीत पार पडले तर हा स्मार्ट पायजमा येत्या २ वर्षांत तुमच्या आमच्या अंगात असेल.
त्याची किंमत ७५ ते १५० पौंड अर्थात सव्वासहा ते साडेतेरा हजार रुपयांच्या आसपास असेल. प्रस्तुत पायजम्यात ५ स्वयंचलित सेन्सर्स असतील. ते सातत्याने व्यक्ती झोपल्यानंतर त्याचे हार्टबिट, श्वासोच्छ्वास व झोपण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवतील.
सेन्सर्सयुक्त पायजमा म्हटले की, आपल्या डोळ्यापुढे एखादे तंग (फिट्ट) वस्त्र उभे राहते; पण हे वस्त्र तंग नव्हे, तर सैल असेल. त्यावरील सेन्सर्स वेगवेगळ्या भागांवर फिट करण्यात आलेत. त्यामुळे कसेही झोपले तरी त्याचा स्पर्श शरीराला होत राहून व्यक्तीचा अचूक डेटा मिळत राहील.
‘सौंदर्यशास्त्र व वस्त्राची जाणीव होऊ न देता उपयोगी सिग्नल कसे मिळवायचे, हे मुख्य आव्हान आमच्यापुढे हे वस्त्रवजा उपकरण तयार करताना होते,’ असे प्रोफेसर त्रिशा एल. अँड्र्यू यांनी याविषयी बोलताना सांगितले आहे. ‘सामान्यत: लोकांना सेन्सर्सयुक्त वस्त्र तंग वाटतात; पण प्रस्तुत वस्त्र तसे नाही.
याचा लोकांच्या झोपेवर कोणताही परिणाम होणार नाही. या वस्त्राद्वारे मिळालेल्या डेटाच्या आधारावर व्यक्तीच्या झोपण्याच्या पद्धतीत योग्य ती सुधारणा करण्यास मदत मिळेल,’ असे त्या म्हणाल्या. संगणक शास्त्रज्ञ दीपक गेनसन यांनीही असे मत व्यक्त केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अपुऱ्या झोपेमुळे व्यक्तीला तणाव, हृदयरोग, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी अनेक शारीरिक व मानसिक आजारांचा सामना करावा लागतो; पण या पायजम्यामुळे व्यक्तीला गुणवत्तापूर्ण झोप मिळणार असल्यामुळे हे आजार कोसोदूर राहण्यास मदत मिळणार आहे.