इस्लामाबाद : ‘पाकने आपला मार्ग बदलला नाही तर त्याचे विघटन होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही’, या भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाचा पाकने मंगळवारी निषेध केला.
‘भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हरियाणातील एका प्रचारसभेत पाकविषयी केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो’, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.
‘राजनाथ यांचे प्रक्षोभक विधान भाजपची पाकविरोधी ‘टोकाची महत्त्वाकांक्षा’ व ‘मानसिकता’ दर्शवणारे आहे. त्यांनी एका सार्वभौम देशाचे तुकडे करण्याची धमकी दिली आहे. त्यांचे विधान अत्यंत बेजबाबदार असून, जागतिक समुदायाने त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे’, असे पाकने म्हटले आहे.