अखंड संगमनेर तालुक्याचा विकास करणार – ना. राधाकृष्ण विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर : आजपर्यंत संगमनेर तालुक्याची विकासाची प्रक्रिया एका कुटुंबापुरती राबविली गेली. आपल्याला आता एका परिवाराचा नव्हे; तर अखंड तालुक्याचा विकास करायचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या निवडणूक प्रचारार्थ वडगावपान, सुकेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत विखे पाटील यांनी राज्य सरकारने केलेल्या कामाची माहिती देवून आ. थोरात यांच्या एकाधिकारशाहीवर टीका केली.

यावेळी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, बापूसाहेब गुळवे, शाळीग्राम होडगर, आप्पा केसेकर, जयवंत पवार, डॉ. अशोक इथापे, सतिश कानवडे, अशोक सातपुते, सुधाकर गुंजाळ, अर्जुन काशिद, भाऊसाहेब थोरात, मंगेश थोरात, विनायक थोरात यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा संदेश दिला. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारने सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले. घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचा प्रयत्न तसेच अंगणवाडी व आशा सेविकांचे सरकारने मानधन वाढवून दिले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने समाजातील युवकांना पुढे जाण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बजावलेली भूमिका महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यात विकासाची प्रक्रिया फक्त कुटुंबाभोवती केंद्रीत झाली. ठेकेदार आणि माफीयांना हाताशी धरून होणारा विकास हा अखंड परिवारासाठी असून, आता अखंड तालुक्याचा विचार करून विकास करायचा आहे.

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू म्हणाले, केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात युती सरकारने केलेले काम हे लोकहिताचे झाले. सरकारच्या धोरणामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

पराभव त्यांना समोर दिसू लागला असून, राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार असून, यावेळी संगमनेर तालुक्यात नक्कीच परिवर्तन होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आप्पा केसेकर, जयवंत पवार, अशोक सातपुते यांची भाषणे झाली. सायखिंडी येथे पदयात्रेच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24