बांदा : उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात पत्नीची हत्या केल्यानंतर सासरच्या मंडळीला जखमी करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघड झाली.
गाझीपूर पोलीस ठाणे हद्दीतील फतेहपूर येथे पत्नीला भेटण्यासाठी छत्तीसगडहून निसार कुरैशी आला होता. बुधवारी त्याने किरकोळ वादानंतर कुऱ्हाडीने सपासप वार करत पत्नीची हत्या केली. यानंतर सासरच्या मंडळीला जखमी करून त्याने गावातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, संबंधित प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी केलेल्या जबर मारहाणीत कुरैशीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कुरैशीचा भाऊ इशहाकच्या तक्रारीवरून १५० जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस ठाणे अधिकारी संदीप तिवारी यांनी दिली.