राहुरी : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करीत गजाआड केले आहे. एक जण पसार झाला आहे. ही कारवाई मुळा धरणाजवळ शुक्रवारी रात्री करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फरारी असलेला अट्टल आरोपी मच्छिंद्र गोरक्षनाथ सगळगिळे (रा. टाकळीमिया) हा मुळा धरणाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीच्या रोडवर मच्छिमारांच्या झोपड्यांजवळ इतर साथीदारांसह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येणार आहे.
या माहितीवरून देशमुख यांनी तातडीने उपनिरीक्षक गणेश शेळके व इतर कर्मचाऱ्यांना सांगून बातमीची खात्री करून घेतली व या ठिकाणी छापा टाकण्याचा आदेश दिला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल, गणेश शेळके, सहायक फौजदार डी. बी. जाधव, हे. कॉ. आयुब शेख, डी. के. आव्हाड, जायभाय, एस. जी. टेमकर, कॉ. गुंजाळ, पो. ना. मेटकर यांनी परिसराच्या काही अंतरावर सापळा लावला.
यावेळी त्यांना सगळगिळे व इतर चार जण दिसून आले. यावेळी दोघांच्या हातात कोयत्यासारखे हत्यार दिसले. पोलिसांनी त्यांच्या हालचाली बघून छापा मारला असता ते पोलिसांना पाहून पळू लागले असता त्यांचा पाठलाग करून त्यातील चार जणांना पोलिसांनी जेरबंद केले.