श्रीगोंदे :- चार वर्षांत भाजप सरकारने तालुक्यात आपली सत्ता नसतानासुध्दा मागेल तेथे निधी देऊन विकासाला गती दिली. या विकासकामांमुळे लोकप्रतिनिधीची पोटदुखी वाढली, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे सांगितले.
रस्ते, पथदिवे, नळपाणी, संरक्षक भिंत अशा दीड कोटीच्या कामाचा प्रारंभ पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
जि. प. सदस्य सदाशिव पाचपुते, माउली पाचपुते, सुनील दरेकर, बबनराव राहिंज, अमोल पवार, सरपंच सुलोचना वाघ, उपसरपंच संदीप पाचपुते, ज्ञानदेव गवते, रामदास शिरोळे या वेळी उपस्थित होते.
पाचपुते म्हणाले, कोट्यवधींचा निधी मिळवून सुरू केलेली सर्व कामे प्रगतिपथावर आहेत. पण जे निवडून गेले, त्यांना मात्र चार वर्षांत काही करता आले नाही.
चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम ते करत आहेत. प्रत्येक गावात विकासकामांचा प्रस्ताव देऊन तेथे निधी मिळवला, म्हणून हितचिंतकाची पोटदुखी वाढली आहे.