प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आपली जीवनयात्रा संपवतोय…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

युद्घ-संघर्षापेक्षाही आत्महत्येमुळे मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जगात प्रत्येक वर्षी जवळपास ८ लाख लोक मृत्यूला कवटाळत आहेत. अर्थात प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आपली जीवनयात्रा संपवीत असल्याची चिंताजनक माहिती जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने सोमवारी दिली आहे.

प्रामुख्याने गळफास, विषप्राशन आणि गोळी झाडून लोक स्वत:चे जीवन संपवीत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सरकारने व्यापक पातळीवर कृती योजना आखण्याची गरज डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे. 

आत्महत्या ही जागतिक आरोग्य समस्या बनली आहे. जगातील सर्व वयाचे, लिंगाचे आणि प्रदेशातील लोक याच्या तावडीत सापडत चालले आहेत. एकाचा मृत्यूचा परिणाम हा अनेकांच्या आयुष्यावर होत आहे. १५ ते २९ वयोगटातील पिढीमध्ये आत्महत्या हे रस्ते अपघातानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे.

 तर १५ ते १९ वयोगटातील मुलींमध्ये गरोदरपणामधील मृत्यूनंतर आत्महत्या हे दुसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण आहे. अल्पवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. रस्ते अपघात आणि परस्पर हिंसाचारानंतर आत्महत्येद्वारे अल्पवयीन मुले मृत्यूला शरण जात असल्याचे विदारक चित्र आहे. 

एकंदरित प्रत्येक वर्षी जवळपास ८ लाख लोक आयुष्य संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतात. ही संख्या मलेरिया, स्तनाचा कर्क रोग, युद्घ आणि खून यांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे, असे डब्ल्यूएचओने नमूद केले आहे. 

जागतिक पटलावरील आत्महत्येच्या संख्येचा विचार केल्यास २०१० ते २०१६ दरम्यान आत्महत्येच्या प्रमाणामध्ये ९.८ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. पण ही घट समाधानकारक नाही. कारण याच कालावधीत अमेरिकन भूभागामध्ये आत्महत्येचे प्रमाण ६ टक्क्यांनी वाढले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24