अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होवून तीन दिवस झाले असून नगर-पुणे महामार्गावरील स्टेट बँक चौकात अद्यापही भाजपची पोस्टर झळकत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी केली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
आचारसंहिता कालावधीत विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणुक चिन्हे लिहिणे, कापडी बॅनर अथवा फलक लावणे, झेंडे लावणे आधी कारणाने मालमत्ता विद्रुपित करण्यावर निवडणुक आयोगाने बंदी घातली आहे.
अशा परिस्थितीत राजकीय पक्ष वा उमेदवारांनी खासगी मालमत्ता विद्रुपित केली असेल तर त्यांनी तत्काळ पोस्टर्स, घोषणा, झेंडे, फ्लेक्स काढून टाकण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र अद्यापही स्टेट बँक चौकात भाजपचे जनादेशयात्रेचे फलक राजरोसपणे लावल्याले दिसत आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश राजकीय पक्षांबरोबर उमेदवारांना दिले आहेत. मात्र, हे आदेश राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पायदळी तुडविले असल्याचे दिसत आहे.