दिल्ली : देशात आध्यात्मिक गुरू किंवा साधू-संतांच्या वेशात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे एजंट मोकाट फिरत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर, समाजातील या बनावट नकली साधूंपासून सावध राहण्याचा इशारा भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
साध्याभोळेपणाचा आव आणत काही पाकिस्तानी गुप्तचर हेर भारतात दाखल झाल्याचे ठोस वृत्त आहे. त्यांच्याद्वारे सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांची गोपनीय तथा संवेदनशील माहिती जाणून घेतली जात आहे. प्रसंगी जवानांच्या कुटुंबीयाना प्रलोभन दाखविले जाण्याची शक्यता आहे.
या आधारे भविष्यात सैनिकांना लक्ष्य करण्याचा त्यांचा डाव आहे, असे लष्कराने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात भारतीय मीडियाने वृत्त दिले आहे. पाकची गुप्तचर संस्था आयएसआयने आता भारतीय जवानांची व त्यांच्या परिवाराची माहिती गोळा करण्यासाठी साधू-संत म्हणून हेर पाठविले आहेत.
आयएसआयद्वारे वापरलेला हा एक आधुनिक हातखंडा असल्याचा दावा भारतीय लष्कराने केला आहे. पाकच्या कोणत्याही गोपनीय कुरापतींना अजिबात बळी पडू नका, असे आवाहनसुद्धा लष्कराने केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे गुप्तचर एजंट हे यूट्यूब, वॉट्सॲप आणि स्काइपचा वापर करीत आहेत. या माध्यमातून सेवारत सैनिकांना निशाणा बनविला जात आहे. लष्कराने १५० सोशल मीडिया प्रोफाईलची ओळख पटविली आहे. ज्यावर पाकिस्तान एजंट असल्याचा संशय आहे.