अहमदनगर :- भिशीच्या नावाखाली तब्बल ५३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मॅक्सस्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (५०, वाकोडीफाटा, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन कारभारी साळुंके (प्रेमदान चौक) व युवराज सोपान रणसिंगे (शेरगाव, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
मॅक्सस्वेर क्युरिज इंडिया कंपनीचे कार्यालय नगर शहरातील प्रेमदान चौकातील डौले हॉस्पिटलशेजारी होते. या कंपनीत भिशी पद्धतीने व्यवहार केले जात होते. फिर्यादी चंद्रकांत गवळी यांनी २५ लाख, तसेच मोहन नाथा दुसुंगे (नेहरू चौक, भिंगार) यांनी पाच लाख,
किशोरकुमार रामपाल प्रजापती (भिस्तबाग चौक) यांनी ८ लाख ९० हजार रूपये, अनिल श्रीमल पितळे (नवी पेठ) यांनी ७ लाख रूपये, रामचंद्र दशरथ बिडवे (भिंगार) यांनी ७ लाख ५० हजार रूपये गुंतवणूकीच्या माध्यमातून भरले होते. संबंधित कंपनीने गुंतवणूक करणाऱ्याला व्याजरूपात कुठलाही मोबदला न देता तब्बल ५३ लाख ४० हजारांची फसवणूक केली.