जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.17) कापडबाजारात मनपा कर्मचार्यांना कारवाईस मज्जाव करुन हालकून लावण्यात आले होते. दरम्यान, मनपाच्या कठोर कारवाईमुळे बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
मँगो किड्सचे सुरेश राज पुरोहित व मोटवाणी साडी सेंटरचे पमनदास मोटवाणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिकचा वापर अद्यापही सुरू असल्याने महापालिकेने कारवाईसाठी मोहीम सुरू केलेली आहे.
या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि.17) मनपाच्या पथकामार्फत बाजार पेठेत दुकानांमध्ये तपासणी सुरू असताना कर्मचार्यांनी मँगो डॉल किड्स वर्ल्ड व मोटवाणी सारीज् या दोन दुकानांमधून बंदी असलेल्या ‘नॉन ओव्हन बॅग्ज’ जप्त केल्या.
शासनाच्या निर्देशानुसार 5 हजार रुपयांचा दंड भरण्याची सूचना कर्मचार्यांनी दुकानातील व्यापार्यांना केली. मात्र, त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. तसेच कर्मचार्यांकडून पंचनामा करण्यात आल्यानंतर ‘तुम्हाला जे करायचे ते करा’, असे म्हणत कर्मचार्यांना अरेरावी करण्यात आली.
या घटनेनंतर बुधवारपासून बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम कर्मचार्यांनी थांबविली. संबंधित व्यापार्यांवर मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्याचा अहवाल त्यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे सादर केला होता. तसेच पोलिस बंदोबस्ताचीही मागणी करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शनिवारी (दि.21) स्वच्छता निरीक्षक विधाते यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली. त्यानुसार पुरोहित व मोटवाणी यांच्या विरोधात कलम 353, 34 प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.