दारूड्या नातवाकडून आजी-आजोबांना मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

करंजी :- दारूड्या नातवाकडून होणाऱ्या मारहाणीला आजी व आजोबा वैतागले आहेत. मात्र, पोलिस या नातवावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.

दारू पिऊन घरी येणाऱ्या नातवाकडून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने या जाचाला वैतागलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आजीबाई, रखमाबाई रंगनाथ अकोलकर यांनी थेट पाथर्डी पोलिस ठाणे गाठले.

पोलिसांनी नातू मालू रामदास अकोलकर (वय ३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तथापि, गुन्हा दाखल होऊन दोन महिने उलटले, तरी आजीच्या तक्रारीची पोलिसांकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

रखमाबाईंनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मी व पती रंगनाथ अकोलकर, सून सिंधूबाई व नातू मालू एकत्र राहतो. नातू मालू गेल्या काही दिवसांपासून दारू पिऊन येतो व मला, माझ्या पतीला शिवीगाळ करून जबर मारहाण करतो.

या मारहाणीत रंगनाथ (वय ७५) यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने मागील काही दिवसांपासून ते अंथरूणाशी खिळून आहेत.

सतत होणारी शिवीगाळ व मारहाणीमुळे आम्हाला जीवन जगणे मुश्किल झाले. सततच्या भांडणामुळे नातेवाईक, शेजारची मंडळी हतबल झाल्याने नातवाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

परंतु, पोलिसांनी तक्रारीकडे डोळेझाक केली. नातवावर कारवाई न झाल्यास दोन दिवसांत पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा आजी रखमाबाई यांनी दिला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24