नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात अगोदरच गुन्हेगारीने कळस गाठला असतानाच एका २० वर्षीय दलित तरुणाला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उजेडात आली आहे. आंतरजातीय संबंध असल्याच्या संशयावरून वरील ऑनर किलिंगचा प्रकार घडला.
पोटच्या गोळ्याला जिवंत जाळल्यामुळे जबर हादरा बसलेल्या आईनेसुद्धा प्राण त्यागला आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेवरून काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.
उत्तरप्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील भदेसा जिल्ह्यात अभिषेक ऊर्फ मोनू या तरुणाला एका घरात बंधक बनविण्यात आले व बेदम मारहाण करण्यात आली. अखेर त्याला जिवंत जाळण्याचा अमानवीय प्रताप करण्यात आला.
पीडित युवकाचा रडण्याचा आवाज ऐकताच गावकरी जमा झाले. त्यानंतर अतिशय विदारक स्थितीत त्याला स्थानिक इस्पितळात भरती करण्यात आले; परंतु हरदोईच्या डॉक्टरांनी त्याला लखनौला हलविण्याचा सल्ला दिला.
तोपर्यंत अभिषेक मरण पावला होता. या घटनेवरून विरोधी पक्ष काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार राज्यासाठीच नव्हे, तर सबंध देशासाठी लज्जास्पद असल्याचा प्रहार काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.