प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

परळी : प्रेम प्रकरणातून शहरातील एका तेवीस वर्षीय तरुणाचा ब्लेडने गळ्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२) उघडकीस आली. याप्रकरणी दोन अल्पवयीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अनिल बसवेश्वर हालगे (२३, रा. गणेशपार, परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. शहर ठाण्याजवळील कब्रस्तानमध्ये त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला.

या युवकाच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या खुणा दिसून आल्याने ही हत्या असल्याचा संशय होता. शहर पोलिसांनी तेथे धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.

याप्रकरणी महेश शिवराजअप्पा हालगे यांच्या फिर्यादीवरून सुरुवातीला अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. मारेकऱ्यांच्या शोधासाठी तीन पथके नेमली होती. या पथकाने अनिलच्या खुनामागील पार्श्वभूमी तपासली तेव्हा त्याचे एका मुलीवर प्रेम होते, असे समोर आले.

त्याच्या प्रेयसीच्या भावाने एका मित्रास सोबत घेऊन अनिल हालगेवर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर अनिलच्या प्रेयसीच्या भावाला व त्याच्या मित्रास पोलिसांनी ताब्यात घेतले. ते दोघेही अल्पवयीन आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24