अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : धुळे येथून नगरकडे अनधिकृ तरित्या घेऊन जाणाऱ्या एका क्रेटा गाडीतून ३ गावठी कट्टे, २६ जिवंत काडतुसे, चार मॅगझिन कारसह १० लाख ८७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत नगर जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. बुधवारी (दि. १८) सकाळच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक तालुका परिसरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, अहमदनगर जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगार घातक शस्त्र बाळगून धुळ्याकडून अहमदनगरकडे येणार आहेत.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील विंचूर चौफुली परिसरात सापळा लावला. यात शहराच्या दिशेने येत असलेली एक सफेद रंगाची क्रेटा (एम. एच. १६ बी. एच. ८३८०) कार अडविली असता ही माहिती खरी निघाली.
सदर वाहनातील संशयीत दिनेश ज्ञानदेव आळकुटे (वय ३०, रा. पाईपलाईन रोड, सावेडी, जि. अहमदनगर) व सागर मुरलीधर जाधव (वय २१, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांच्या कब्जातून तीन गावठी पिस्तूल, २६ जिवंत काडतुसे व चार मॅगझिन असे घातक अग्निशस्त्रे तसेच मोबाइल, क्रेटा कार असा एकूण १० लाख ८७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयीत दिनेश आळकुटे याच्यावर यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.