युवक दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता; आत्महत्या केल्याचे उघड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी: राहुरी तालुक्यातील वांबोरी व वरवंडी येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघा तरूणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मंगळवारी मध्यरात्री या घटना घडल्या. वांबोरी येथील प्रमोद गोरक्षनाथ भोसले (वय २३, राहणार ससे गांधले वस्ती) हा महाविद्यालयीन युवक दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता.

बुधवारी सकाळी वांबोरी परिसरातील गणपती घाट येथील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला.

घटनेची माहिती मिळताच वांबोरी येथील हवालदार शैलेश सरोदे, हेड काॅन्स्टेबल अशोक तुपे यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी वांबोरी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दुसरी घटना तालुक्यातील वरवंडी येथे मध्यरात्री घडली. बाळासाहेब लहानू जाधव (वय ३८) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

रात्री आपल्या घरात ते एकटेच झोपले होते. सकाळी उशिरापर्यंत त्यांनी घराचे दार उघडले नाही. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा ठोठावत बाळासाहेब यास उठवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून आत डोकावले असता जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

या घटनेचा तपास पोलिस नाईक कारेगावकर करत आहे. वांबोरी व वरवंडी या दोन ठिकाणी घडलेल्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24