उत्तर प्रदेश :- हरदोईच्या सरकारी रुग्णालयातील परिचारिकेने ६-६ बोटे असलेल्या नवजात अर्भकाचे एक-एक बोट कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मृत बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून परिचारिकेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरदोईतील बाढ करेंखा गावातील लक्ष्मी नामक महिलेला शनिवारी रात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तिला तातडीने बिलग्राममधील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी)मध्ये दाखल करण्यात आले.
रविवारी सकाळी लक्ष्मीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या हाताला पाचऐवजी सहा-सहा बोटे होती; परंतु रुग्णालयातील परिचारिका विद्यादेवीने बाळाचे एक-एक बोट कापून टाकल्याचा आरोप लक्ष्मीचे पती रवींद्र यांनी लावला. बोट कापल्याने बाळाची प्रकृती खालावली; परंतु रुग्णालयाने त्याकडे कानाडोळा करत आई व बाळाला रुग्णालयातून सुट्टी दिली.