मोदी व शहा हे गुजरातहून दिल्लीत आलेले घुसखोर आहेत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
दिल्ली –  ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे घुसखोर आहेत, असा तीक्ष्ण प्रहार काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधिर रंजन चौधरी यांनी रविवारी केला आहे.
देशावर सर्वांचा हक्क आहे. भारत कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीचा देश नाही. सर्वांना समान हक्क मिळाले असून, ‘एनआरसी’मुळे सामाजिक सौहार्द धोक्यात येईल, अशी टीका त्यांनी केली आहे.
केंद्र सरकार ‘एनआरसी’ विधेयक लवकरच संसदेत मांडण्याच्या तयारीत आहे. त्यातच लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी आक्रमकपणे भाजपावर शरसंधान साधले. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी व अमित शहा हे घुसखोर आहेत. त्यांचे गृहराज्य गुजरात आहे; परंतु सध्या त्यांनी दिल्लीत बस्तान मांडले आहे, अशी टीका चौधरी यांनी केली आहे.
केंद्र सरकार ‘एनआरसी’ विधेयक मांडणार आहे; परंतु यामुळे कोणताही हेतू साध्य होणार नाही. कारण देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले आहेत. मात्र, एनआरसी विधेयकामुळे नागरिकांत अस्थिरतेची भावना निर्माण होईल, अशी भीती त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याचा अधिकार सरकारला नाही.
भारताचे मूळनिवासी असलेले नागरिक ‘एनआरसी’मुळे संभ्रमात आहेत, असे चौधरी म्हणाले. मुस्लिमांनी देश सोडून का जावे? भाजपा मुस्लिमांना का पिटाळून लावत आहे? असे सवाल उपस्थित करत प्रत्येक नागरिकाला देशात वास्तव्य करण्याचा अधिकार मिळाल्याचे त्यांनी ठासून सांगितले. दरम्यान, सध्या अर्थव्यवस्थेला मरगळ आली आहे. अशा स्थितीत मोदींनी यथास्थिती नागरिकांपुढे मांडली पाहिजे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपापल्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असा टोला अधिर रंजन चौधरी यांनी लगावला आहे. घटलेला जीडीपी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवर नरेंद्र मोदी यांनी मौन का बाळगले? असा सवालसुद्धा त्यांनी केला.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24