नगर : केडगावचा अजूनही विकास झालेला नाही. अनेक वर्षांपूर्वी केडगावचा नगरच्या हद्दीमध्ये समावेश झाला. परंतु योग्य नेतृत्वा अभावी आजही केडगाव मधील पाणी, रस्ते, गटारी यासारख्या मूलभूत सुविधा केडगावकरांना उपलब्ध झालेल्या नाहीत.
त्यामुळे निवडून आल्यानंतर आपण स्मार्ट केडगावची निर्मिती करणारा असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी केले आहे.
केडगाव मधील प्रचाराचा शुभारंभ करत असताना किरण काळे बोलत होते. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ.अशोक सोनवणे, सरचिटणीस सुनील शिंदे, युवक आघाडीचे अध्यक्ष सागर भिंगारदिवे,दिलीपराव साळवे, मयूर भिंगारदिवे, ईश्वर सोनवणे, सुरज कांबळे, अनुप धीवर, सुमन लोळगे, बंटी वैराळ, राहुल लोंढे, पंकज सामने, शेखर ठोंबे, अजय नेटके, अजिंक्य ठोंबे, सिद्धार्थ पाटील, स्वप्नील पाठक, सुरज माळी, निलेश जाधव, शैलेश गायकवाड आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना काळे म्हणाले की, केडगाव सातत्याने या न त्या कारणाने चर्चेत असते. या भागामध्ये असणारी दहशत, राजकारण्यांनी पोसलेल्या गुंडांच्या टोळ्या यामुळे परिसरातील नागरिक कायम त्रस्त असतात. इथे घडलेल्या काही गोष्टींचं राजकीय भांडवल करण्यासाठी काही मंडळीनी केडगावच्या जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. ही अत्यंत निंदनीय बाब आहे.
मला अशा प्रकारच्या राजकारणात रस नाही. केडगावचा विकास हे एकमेव आपले ध्येय आहे आणि त्यासाठी विधानसभेत सत्तापरिवर्तन महत्त्वाचे आहे. माझ केडगावच्या नागरिकांना आव्हान आहे, की आपण कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडा.
मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी करत आपल्याला सक्षम तिसरा पर्याय दिला आहे. त्याला केडगावकरांनी भरभरून प्रतिसाद देखील दिलेला आहे. मला एकदाच आपली सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन यावेळी किरण काळे यांनी केडगावकरांना केले.