कोपरगाव : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात आपल्याला अटक करू नये यासाठी ४० हजारांची लाच मागणारे शिर्डी पोलिस ठाण्याचे दोन पोलिस शिपायांविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी. मैद अशी आरोपींची नावे आहेत. कोपरगाव येथील सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठिकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी-विक्रीचे दुकान असून कोपरगाव बागुल वस्ती येथील बंडू जगताप नावाच्या एका युवकाने त्यांच्याकडून मे २०१८ रोजी एक दुचाकी खरेदी केली होती.
ती त्याने दुसऱ्याल विकली. दरम्यान, शिर्डीत एका परप्रांतीय महिलेची पर्स ओढताना काही चोरटे पकडण्यात आले होते. त्यात दुचाकी सापडल्याने शिर्डी पोलिस शिपाई ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांनी दुचाकी दलाल सागर सय्यद व त्यांचा भाऊ मोहसीन सय्यद यांचेकडील असल्याने सागर सय्यद त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा राहुल काकडे यांची नावे वगळण्यासाठी पन्नास हजारांची मागणी केली.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणतांबा चौफुलीवर २२ नोव्हेंबर रोजी सापळा लावला होता. पंचासमक्ष चालू असताना आरोपी पोलिस शिपाई सुपेकर व मैद यांना संशय आल्याने त्यांनी पोबारा केला होता.
एसीबीचे विभागीय पोलिस अधिकारी एच. डी. खेडकर यांनी समक्ष भेट देऊन पाहणी करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला.