आवर्तन पाहिजे असेल तर थकीत पाणीपट्टी भरा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव : गोदावरी उजव्या कालव्याला रब्बी आवर्तन सुटणार असून, आधी थकीत पाणीपट्टी भरण्याची सक्ती केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. रब्बी आवर्तन नसल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी मागणीचा ७ नंबर फॉर्म भरून घेतले जात आहेत.

मात्र, ज्यांची थकीत पाणीपट्टी असेल त्यांना पाणीपट्टी भरणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीची पसरली आहे. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, डाऊच, चांदेकसारे, जेऊर कुंभारी येथील शेतकरी सावळीविहीर पाटबंधारे विभागाच्या ऑफिसवर रब्बीच्या पाटपाणी मागणीचा फार्म भरण्यासाठी गेले असता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आधीची पाटपाणीपट्टी भरा.

नंतर ७ नंबर फार्म स्वीकारले जातील, असा फतवाच काढल्याने अतिवृष्टीच्या पावसाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना याचा खूप त्रास होत आहे. दुष्काळ व यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आहे. सर्व पिके अतिवृष्टीने पाण्यात सडून गेली. शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही आला नाही.

सरकारने ८० रुपये गुंठेवारीप्रमाणे नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली. तरीही मोठ्या उमेदीने उभा राहिलेल्या शेतकऱ्याने रब्बीचे पीक घेण्यासाठी कंबर कसली. दारणा, गंगापूर धरणे शंभर टक्के भरल्याने रब्बीचे तसेच उन्हाळी आवर्तनही आपल्याला मिळेल या आशेने शेतकरी संतुष्ट होता.

मात्र पाटबंधारे विभागाच्या ऑफिसवर ७ नंबर फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी आधीची पानपट्टी भरा, असे सुनावले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. वास्तविक अतिशय अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने मागील पाणीपट्टी माफच करणे गरजेचे होते.

सध्या सुरू असलेल्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमात सर्व शेतमकऱ्यांचे फॉर्म पाटबंधारे विभागाने भरून घ्यावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24